परवा वैभव दादा सोबत ह्या विषयावर बोलणं झालं आणि त्यांनतर लगेच त्यांची एका रेडिओ चॅनलला ह्या संदर्भात दिलेली मुलाखत पाहिली. नमस्कार नागपूर ! ह्या वाक्याने सुरु झालेली मुलाखत जशी जशी पुढे जात होती. तसा तसा भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा आणि त्याचा सन्मान आणि तिथून पुढे एक वादळ भारताचं नेमकं काय आहे हे एकदम सोप्या वर्हाडी बोलीतून त्यांनी समजावून सांगितलं होत.
आमच्यासारख्या कॉर्पोरेट कंपन्यात काम करणाऱ्या लोकांच्या आधीच सुट्ट्यांची बोंब असते आणि त्यात नॅशनल हॉलिडे मिळाला तर मग मजा वाटते कारण, आठवडी सुट्टी आणि अजून एक सुट्टी म्हणजे सोने पे सुहागा
अशी आमची मानसिकता आहे आणि मला वाटतं हि फक्त आमचीच नाही तर आज जवळपास देशातल्या सगळ्याच लोकांची मानसिकता आहे पण, राष्ट्रीय सन हा सुट्टी नसतो तर, तो आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन आपली देशाविषयी असणारी सद्भावना किंवा कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस असतो
आपलं राष्ट्रगीत आणि आपला राष्ट्रध्वज हे आपली भारतीय असल्याची जागतिक ओळख आहे आणि त्या ओळखीच्या जनजागृतीसाठी नागपुरातून सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चळवळ उभी केली जाते आणि पाहता पाहता ती चळवळ सगळ्या महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरते. फक्त “52” सेकंद आपण राष्ट्रगीत आणि मानवंदनेसाठी उभे राहू शकत नाही का ? स्वतःलाच असा प्रश्न विचारायला हि चळवळ भाग पाडते. वैभवदा असेल किंवा त्यांचे राज्यभरातले इतर सहकारी असतील ते ह्या चळवळीच्या माध्यमातून आपल्यातलं मरायला लागलेलं भारतीयत्व पुन्हा नव्याने जिवंत करायचा प्रयत्न करत आहेत.
#eksathjayhind #ekvadalbharatach #thestormofindia #एकवादळभारताचं #nagpur #maharashtra #india